Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

3/09/2016

सुझान वॉजीस्की - ईंटरनेट जगतातली सर्वात शक्तीशाली महिला !

                       आयुष्यात निर्णय घेणे महत्त्वाचे असते आणि त्याहून महत्त्वाचे असते ते म्हणजे त्या निर्णयांवर कृती करणे. आपले निर्णय चूक किंवा बरोबर नसतात्...त्यांचे परीणाम चांगले किंवा वाईट असतात्...आणि निर्णय घेतला काय किंवा नाही घेतला काय परीणाम चांगले किंवा वाईट होणारच. म्हणून निर्णय घेणे महत्त्वाचे. एक छोटासा निर्णय आणि त्यावर केलेली कृती आपलं भविष्य कमालीचं बदलवू शकते.आज मी तुम्हाला सुझान वॉजीस्कीबद्दल (Susan Wojcicki) सांगणार आहे. काही वर्षांपुर्वी तिने असाच एक निर्णय घेतला होता...ज्याने तिचे पुढचे संपुर्ण आयुष्य बदलून टाकले.....इतके की टाईम मॅगझीनने तिला २०१५ सालची "ईंटरनेट जगतातली सर्वात शक्तीशाली महिला" असे संबोधले. मित्रांनो सुझान वॉजीस्की ही युट्युबची सीईओ आहे.

           सुझान ३० वर्षाची असताना तिने एक घर घेतले होते. आणि घराच्या कर्जाचा हप्ता फेडणे सोपे व्हावे या उद्देशाने तिने घराचे गॅरेज भाड्याने द्यायचे ठरवले. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन या नुकत्याच कॉलेजमधून बाहेर पडलेल्या दोन तरुणांना आपली नवी कंपनी सुरु करण्यासाठी तिने गॅरेज भाड्याने दिले. मित्रहो, या दोघांनी सुझानच्या घरी जी कंपनी सुरु केली तिचे नाव होते "गुगल".


सुझानच्या घरी लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन अहोरात्र काम करत असतानाच, आपली कंपनी पुढे जग कशी बदलवून टाकणार आहे याबाद्दल नेहमी सुझान बरोबर बोलत. असंच एकदा गप्पा मारता मारता त्यांनी सुझानला गुगलमध्ये काम करण्याची ऑफर दिली. दोन तरुणांनी सुरु केलेली ही छोटीशी कंपनी जॉइन करण्याचा सुझानने निर्णय घेतला आणि तो निर्णय तिचे जिवन बदलवून टाकणारा ठरला. सुझानने गुगलच्या
पहिल्या मार्केटींग मॅनेजर पदाचा भार सांभाळला तेव्हा ती चक्क ४ महिन्यांची गरोदर होती. गुगलच्या कर्मचार्‍यांमध्ये "आई" बनणारी सुझान पहिलीच कर्मचारी होती. म्हणून तिला सुरुवातीला "गुगलमधील आई (मॉम अ‍ॅट गुगल) असे टोपण नाव मिळाले.

       गुगलच्या मार्केटींग डीपार्टमेंट मध्ये काही दिवस काम केल्यानंतर सुझान प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम पाहत होती. तेव्हाच तिला "गुगल अ‍ॅडसेन्स"ची कल्पना सुचली. होय, तीच गुगल अ‍ॅडसेन्स सेवा जिच्यामुळे आज लाखो ब्लॉगर्स आणि वेबसाईट धारक गुगल जाहिरातींच्या मदतीने पैसे कमावत आहेत. गुगलचेही उत्पन्न अ‍ॅडसेन्समुळे कित्येक पटीने वाढले. त्यानंतर सुझानला गुगलमध्ये "द मनी" असे नविन टोपणनाव मिळाले.


       सुझान गुगल व्हीडीओ या गुगलच्या नव्या प्रॉडक्टवर काम करत होती. तेव्हा तिच्या लक्षात आले की युट्युब नावाची एक नवी कंपनी गुगल व्हीडीओ पेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. 

या स्पर्धेत युट्युबवर मात कशी करायची याचा विचार करत असतानाच एक दिवस युट्युबवरील एक व्हीडीओ सुझानच्या पाहण्यात आला. चीन मधील दोन तरुणांनी बॅकस्ट्रीट बॉईज च्या एका गाण्यावर आधारीत स्वतःचा व्हीडीओ बनवून अपलोड केला होता. तो पाहून सुझानच्या लक्षात आले की जगभरातील लोक अगदी घरच्या घरी बसून कित्येक नविन नविन प्रकारचे कंटेंट बनवू शकतात. युट्युबशी स्पर्धा करण्याचे टाळून युट्युब विकत घेण्याचा विचार सुझानला सतावू लागला आणि सहा महिन्यांच्या आतच लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांना युट्युब विकत घेण्यासाठी पटवण्यात सुझानला यश आले. 

फेब्रुवारी २०१४ मध्ये सुझान युट्युबची सीईओ झाली.ती युट्युबचा एवढा मोठा डोलारा सांभाळते आहे आणि तेही पाच मुलांची आई असताना. आजच्या तारखेला सुझानची संपत्ती ३०० दशलक्ष डॉलर इतकी आहे.

मित्रांनो तर ही होती सुझान वॉजीस्कीची अफलातून गोष्ट. तिने घेतलेले काही पॉझीटीव्ह निर्णय तिला इथवर घेऊन आले. 

आता तुमची वेळ आहे...नविन काहीतरी करण्यासाठी पॉझीटीव्ह निर्णय घेण्याची. जर सुझान पाच मुलांची आई असून एवढं मोठं काम करु शकते तर तुम्हीही करु शकता. गरज आहे फक्त पुढे पाउल टाकण्याची. अगदी छोटीशी उडी असेल...पण ती घेतली पाहिजेच.
सुझानने जे मिळवलय तेवढं आपल्याला साध्य होईलच याची काहीच गॅरंटी नाही.....पण साध्य होणार नाही याचीही काही गॅरंटी नाही. आयुष्याच्या शेवटी "हे" करायचं राहून गेलं अशी खंत तर राहणार नाही !


No comments:

Post a Comment